Cine Marathi

Home News Bio About Contact

खऱ्या आयुष्यातील अश्विनी कासार आहे कट्टी बट्टी मधील पूर्वाची प्रेरणा

  'नवे पर्व युवा सर्व' हे ब्रीद वाक्य घेऊन झी युवा या वाहिनीने नेहमीच रसिक प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम मालिका आणल्या आणि प्रेक्षकांनी त्या मालिकांना मनापासून पसंती सुद्धा दिली. या मालिकांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांना अनुभवायला मिळाल्या. प्रेम ही भावनाच अशी आहे, ज्यापासून कोणीही दूर राहू शकलेला नाही. झी युवा या वाहिनीने अहमदनगर मध्ये राहणाऱ्या पूर्वा आणि पराग यांच्या मोडलेल्या लग्नाची आणि जुळलेल्या प्रेमाची गोष्ट 'कट्टी बट्टी' प्रेक्षकांच्या भेटीस आणली. प्रेक्षक सहकुटुंब ही मालिका पाहून त्यात घडणाऱ्या रोजच्या आयुष्यातील गंमतीजंमतींचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत

  मालिकेत प्रेक्षकांनी पाहायला मिळत आहे की पूर्व लग्ना नंतरही तिचं पीएचडीचं शिक्षण पूर्ण करण्याचं ठरवते. पडद्यावरील या व्यक्तिरेखेप्रमाणेच अश्विनीचा ही खऱ्या आयुष्यात उच्च शिक्षणाकडे कल आहे. अश्विनी ही अर्थशास्त्र या विषयात पदवीधर आहे तसेच तिने लॉमध्ये मास्टर्स केले आहे. त्यानंतर उच्च न्यायालयात तिने वकिलीची प्रॅक्टिस देखील केली आहे. शिक्षण हे प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी सर्वात मजबूत हत्यार आहे आणि अभिनय करताना सुध्दा त्याचा महत्वाचा वाटा आहे असे अश्विनीला वाटते. एक असाधारण अभिनेत्री बनून सुध्दा अश्विनीचे मत आहे की तिच्या शिक्षणाचा तिला फायदा झाला. पडद्यावरील जीवनात शिक्षणाला अतिशय महत्व देणारी पूर्व आणि खऱ्या आयुष्यातील अश्विनी यांची शिक्षणाबद्दलची मतं सारखीच आहे.

  मालिकेमधील तिच्या भूमिके विषयी बोलताना, अश्विनी म्हणाली, "या क्षेत्रात येण्याआधी मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मगचं अभिनय करण्याचं ठरवलं. आम्ही काम करत असलेल्या इंडस्ट्रीचे स्वरुप अतिशय अनिश्चित आहे. येथे तुमच्या जागी दुसरे कोणीही लगेच येऊ शकते आणि अशावेळी शिक्षण तुमच्या पाठीशी उभे राहते. कधीतरी तुम्हाला अचानक जाग येते आणि तुम्ही जे काही करत असता ते तुम्हाला आवडेनासे होते तेव्हाही शिक्षणच तुम्हाला वाचवू शकते. तुमच्या शैक्षणिक कारकिर्दीसाठी नाही तर तुमच्या संपूर्ण विकासासाठी शिक्षण महत्वाचे आहे. आजच्या काळातील तरुण चंचल आहेत आणि त्यांना जे काही हवे आहे ते स्पष्टपणे सांगू शकतात, पण तरीही अशा स्थितीत तुम्हाला जे काही आवडते त्याचा अभ्यास करणे चांगले असते कारण परिपूर्ण ज्ञान नेहमीच तुम्हाला मदत करते." तरुणांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करणाऱ्या आणि त्यांना जे आवडते त्यातच करियर करण्याला प्राधान्य देणाऱ्या अश्विनीला पाहणे हे खरोखर प्रेरक आहे.


Tags:- Zee Marathi, Marathi Serials, Ashwini Kasar, Katti Batti , Movie Songs, Teaser, Superhit Marathi Movie, Marathi Masala, Marathi Acters, Acters.