Cine Marathi

Home News Celebs About Contact

अर्थवच्या मुंजीत गुरूला मिळणार महाप्रसाद..!

  'गुरु-राधिका-शनाया' या त्रयीने महाराष्ट्रातील प्रेक्षकवर्गाला अक्षरशः वेड लावले आहे. सध्या लोकप्रियतेच्या बाबतीत 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका मराठी मनोरंजन क्षेत्रात हुकूमत गाजवते आहे. गुरु, राधिका आणि शनायाची अफलातून केमिस्ट्री तसंच हाय व्हॉल्टेज ड्रामापासून प्रासंगिक विनोदापर्यंत अस्सल मनोरंजनानं ठासून भरलेलं कथानक, हे या मालिकेच्या तुफान लोकप्रियतेची मुख्य कारणं आहेत. प्रत्येक एपिसोडगणिक रंगत जाणारं हे कथानक आता आलंय नागपूरच्या एका 'रोमांचक' वळणावर..!

  अथर्वच्या मुंजीसाठी आपलं बिऱ्हाड घेऊन गुरुनाथ गाठणार आहे नागपूर! गुरुनाथ सोडून राधिका आणि इतर सुभेदार कुटुंबाला तसंच मित्रपरिवाराला मुंजीच्या कार्यक्रमासाठी खूप उत्सुकता आहे. गुरुनाथचं मन मात्र शनायासाठी मुंबईतच अडकलंय. फक्त सोपस्कार म्हणून गुरुनाथ मुंजीतले विधी पार पाडणार आहे. गुरूला भुलवण्यासाठी शनायाने राधिकासारखं वागण्याचा असफल प्रयत्न करून पाहिला. आपण राधिकासारखे दिसू शकतो पण बनू शकत नाही हे तिला कळून चुकलं! 'गुरु'कृपेसाठी शनायाची चाललेली धडपड आता तिला एका नव्या वळणावर घेऊन जाणार आहे. राधिका आणि शनायाच्या कचाट्यात सापडलेला गुरू आजवर अनेकदा तोंडघशी पडला आहे. आता वडिलांच्या प्रॉपर्टीचा हव्यास गुरूला आणि गुरूचा सहवास शनायाला नागपूरपर्यंत घेऊन येणार आहे!! आजपर्यंत गुरूने मोठ्या चलाखीने शनाया प्रकरण आपल्या आई-बाबांपासून लपवून ठेवलं होतं, पण अथर्वच्या मुंजीत शनायाच्या 'अचानक भयानक' आगमनाने गुरुनाथची दाणादाण उडणार आहे. शनायाच्या येण्याने मुंजीच्या कार्यक्रमाची सांगता 'धक्कादायक' होणार आहे.

 अथर्वच्या मुंजीत आता गुरुची 'उत्तरपूजा' बांधली जाणार आहे. राधिकाला मुलीसमान मानणाऱ्या गुरूच्या वडिलांकडून गुरुला मिळणार आहे 'महाप्रसाद'! गुरूच्या कर्मांचा 'जागर' अथर्वच्या मुंजीत घालेल का 'गोंधळ'? गुरुचे 'डोहाळे' लागलेल्या शनायाची राधिका करेल का 'पंचारती'? गुरुनाथचे वडील त्याला प्रॉपर्टीमधून करतील का बेदखल? गुरु आणि शनायाला धडा शिकवण्यासाठी आता राधिका कोणतं पाऊल उचलेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये, तेव्हा पाहायला विसरू नका 'माझ्या नवऱ्याची बायको' सोम-शनि रात्री ८ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर!

Tags and Keywords: Majya Navryachi Bayko, Shanaya, Radhika, Atharva , Guru, Marathi Serials, Prime Time Serials, Marathi Acters, Celebrity Child

You May Also Like