Cine Marathi

Home News Bio About Contact

झी टॉकीज आयोजित महाराष्ट्र कुस्ती लीग महाराष्ट्राची ‘दंगल’...

  ‘आपलं टॉकिज झी टॉकिज’ असं म्हणत गेली अकरा वर्षं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ‘झी टॉकिज’ ही वाहिनी आता ‘महाराष्ट्र कुस्ती लीग’ या आधुनिक स्वरूपाच्या कुस्तीस्पर्धेसाठी सज्ज होत आहे. अनेक दिग्गज कुस्तीपटू यात सहभागी होत असून त्यामुळे कुस्ती प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोचणार आहे.

  भारताला मैदानी खेळांची खूप मोठी परंपरा आहे. हॉकी हा भारतचा राष्ट्रीय खेळ जरी असला तरीही ब्रिटिशांनी भारतावर सत्ता स्थापन केल्यापासून त्यांचा राष्ट्रीय खेळ क्रिकेट इकडे आणला आणि तो लोकप्रियही केला. कोणताही मैदानी खेळ, मग तो सांघिक असो वा वैयक्तिक, तो त्या खेळाडूची शारीरिक क्षमता तर तपासतोच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तो खेळ त्या खेळाडूची मानसिक सक्षमताही पडताळून पाहतो.

Kusti Leauge
Kusti Leauge
Kusti Leauge
Kusti Leauge
×

  कुस्ती हा असाच एक मैदानी खेळाचा प्रकार. यात शारीरिक क्षमतेसोबतच कुस्तीपटूची मानसिकताही खेळाच्या निकालावर किती परिणाम करू शकते याचा प्रत्यय येतो. कधी कधी खेळताना अशी एखादी परिस्थिती उद्भवते, की त्यावेळी घेतलेल्या निर्णयानं सामन्याचा जो निकाल लागेल त्यावरून खेळाडूंची मानसिकता समजते.कोल्हापूरचे तत्कालीन राजे छत्रपती शाहू महाराज यांचाही कुस्ती हा आवडीचा खेळ. त्यांनी आपल्या कार्यकाळात कुस्तीच्या प्रचार व प्रसाराला खूप महत्त्व दिलं. तसंच त्यांनी कुस्तीला राजाश्रयही दिला. त्यांच्या याच सकारात्मक पावलांमुळे कुस्ती खेळण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक कुस्तीपटू कोल्हापूरला विविध कुस्तीस्पर्धांमध्ये सहभागी व्हायला येत असत. तसं पाहायला गेलं तर पूर्वी खेळल्या जाणाऱ्या कुस्तीच्या सामन्यांसाठी पंच नसायचे, तर त्या स्पर्धेला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणेच पंचांची भूमिका पार पाडायचे. मात्र आधुनिक स्वरूपातल्या या खेळाला पंच म्हणजेच रेफरी आवर्जून असतात.

  कुस्तीचे नियम अत्यंत साधे असतात. भरपूर माती असलेल्या आखाड्यात दोन खेळाडू म्हणजेच पहलवान एकमेकांसमोर उभे ठाकतात. एकमेकांना हात मारायची त्यांना परवानगी नसल्यानं केवळ ताकदीच्या जोरावर विविध पद्धतींनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला जमिनीवर टेकवायचं आणि सामना जिंकायचा, हाच उद्देश त्यांच्या मनात असतो. आता हीच कुस्ती कात टाकून ती मातीऐवजी मॅटवर खेळली जाते. मातीत खेळल्या जाणाऱ्या कुस्तीपेक्षा मॅटवर खेळली जाणारी कुस्ती आधुनिक स्वरूपाची असून तिला आता ‘ग्लॅमरस व कॉर्पोरेट लूक’ आला आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज खेळाडूंनी कुस्तीमधून आपलं क्रीडा कार्यक्षेत्र फुलवलं आहे. यात महाराष्ट्रातील खाशाबा जाधव यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. १९५२ साली हेलिसिंकी येथे झालेल्या उन्हाळी ऑलिम्पिकस्पर्धांमध्ये त्यांनी कांस्यपदक मिळवलं आणि ऑलिम्पिकस्पर्धांमध्ये पदक मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. त्याचप्रमाणे सध्याचा विचार केला तर योगेश्वर दत्त, सुशीलकुमार यांनीही आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये भारतातर्फे कुस्तीचं प्रतिनिधित्व करून पदकांची कमाई केली आहे. भारतीय महिला कुस्तीपटूही या खेळात कुठेच मागे नाहीत, याचं उत्तम उदाहरण म्हणजे साक्षी मलिक व गीता फोगाट.

  याच कुस्तीला आता प्रत्येक दर्शकापर्यंत पोचवण्यासाठी महाराष्ट्राची अग्रणी चित्रपट वाहिनी ‘झी टॉकिज’ मैदानात उतरत आहे. ‘आपलं टॉकिज झी टॉकिज’ असं म्हणत दि. २५ ऑगस्ट २००७ रोजी दाखल झालेल्या या वाहिनीनं जुने-नवे मराठी चित्रपट दाखवून प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन केलंच आहे. त्याचप्रमाणे अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मितीही या वाहिनीनं केली असून त्यांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आता ‘झी टॉकिज’ ही वाहिनी ‘महाराष्ट्र कुस्ती लीग (MKL)’ या आधुनिक कुस्तीस्पर्धेच्या माध्यमातून कुस्तीच्या आखाड्यात उतरायला सज्ज झाली आहे. दि २ नोव्हेंबर २०१८ ते १८ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार असून त्यात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज पुरुष व महिला कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. पुण्याच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हणजेच बाळेवाडी मैदनावर ही स्पर्धा पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तिपरिषद व अखिल भारतीय कुस्ती महासंघ यांच्याशी ही स्पर्धा संलग्न आहे. ‘झी’ फक्त मनोरंजन क्षेत्रात कार्यरत नसून भारतीय खेळांना सहकार्य व प्रगतिकारक वाटचालीसाठीही प्रेरणा देत आहे. ‘महाराष्ट्र कुस्ती लीग’ हा याचाच एक भाग आहे. तेव्हा तयार राहा या आगामी ‘दंगल’साठी!

  महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की , झी टॉकीज आयोजित महाराष्ट्र कुस्ती लीग मुळे महाराष्ट्रातील आणि भारतातील कुस्ती खेळडूंना आर्थिक सहाय्य होईल. विशेषतः या लीगमुळे महिला खेळाडुंना याचा फायदा होईल. ही लीग खेडयापाडयात पोहचेल आणि पालक कुस्ती खेलाबाबत अधिक जागरूक होतील. या लीगमुळे खेळाडुंना आपल्यातील प्रतिभा दाखवणयासाठी एक नवे व्यासपीठ मिळेल. या खेळाला आर्थिक मदत मिळाल्यानं खेळाडू आणि खेळडूंना खूप मदत होईल. या लीगकडून खूप अपेक्षा आहेत. आगामी २०२० ओलिम्पिकच्या दृष्टिनं ही लीग महत्वाची ठरणार आहे. या लीगद्वारे महाराष्ट्राच्या खेळाडूची ओलिंपिकसाठी निवड होण्यासाठी मदत झाली तर खूप बरं होईल.

  झी टॉकीज आणि झी युवाचे बिझिनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले की, भारतीय खेळाला पाठिंबा देणे आणि त्याच बरोबर कुस्ती सारख्या खेळातुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल बनवणे हेच महाराष्ट्र कुस्ती लीग चे मुख्य उद्दिष्ट आहे. याबरोबरच आपल्या कुस्तीवीरांना त्यांच्या खेळाचा उत्तम आर्थिक मोबदला मिळणे व कुस्तीवीरांच्या खेळाचा दर्जा उंचावणे हे ही तेवढेच महत्वाचे आहे . या सर्व गोष्टीची योग्य दखल झी टॉकीज घेत आहे. 'महाराष्ट्र कुस्ती लीग' द्वारे राज्यस्तरीय , राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा उत्तम खेळ प्रेक्षकांना पहायला मिळेल.


Tags:- #Sai Tamhankar, #Sunny leone, #Dangal, #LOve Sonia, #Zee Marathi, #Marathi Serials,#Adarsh Shinde, #Marathi Movie, #Baapmanus, #Sangeet Samrat, #Ashok Saraf, #Aniket Vishwasrao,#Dostigiri, #Sneha Chavan, #Akshay Kumar, #Sanjay Narvekar, #Umesh Kamat, #Tejeswini Pandit, #Music Launch, #Hindi Movie, #Movie Songs, #Teaser, #Superhit Marathi Movie, #Marathi Masala, #Marathi Acters, #Acters.